मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आरोपांच्या कारवाईसाठी पुढाकार घेतलेल्या भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी बीड (Beed) जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि परळीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरून बीडमधील दोन्ही मंत्र्यांवर टीका केली असल्याचं दिसून आलं आहे.
तसेच, संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड यांनाही खुनाच्या गुन्ह्यात सामील असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता, दीड वर्षांपूर्वी परळीत झालेल्या एका खुनाचा संदर्भ देत धस यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे हे प्रकरण दाबण्यासाठी आका आणि इतर सहकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा गंभीर दावा धस यांनी केला आहे. तसेच, संतोष देशमुख हत्याप्रकरणात मी केलेले आरोप एसआयटीनं सादर केलेल्या पुराव्यांनी समर्थित असल्याचं स्पष्ट झालं आहे. आकाचा संबंध असल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरूनही सिद्ध होत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
अवादा कंपनीच्या शिंदेंना पाथर्डीपर्यंत नेऊन मारहाण करण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या सीसीटीव्हीत आका, चाटे, आणि घुले हे स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा आहे. या प्रकरणात पीआय पाटील यांना सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी केली. महाजन आणि गर्जे यांना निलंबित करावे किंवा त्यांची बदली करावी, अशीही मागणी धस यांनी मांडली. संतोष देशमुख हत्याप्रकरणात आतापर्यंत ७-८ आरोपी होते, आता नववा आरोपीही समाविष्ट केला पाहिजे. “तो मी नव्हेच म्हणणारा, तो मीच आहे हे तुम्हाला समजलं ना,” असं म्हणत त्यांनी त्यांच्या आरोपांना आधार असल्याचं अधोरेखित केलं. याप्रकरणात अजूनही अनेक आरोपी आहेत, त्यांचा बंदोबस्त व्हावा, अशी त्यांनी मागणी केली.
दीड वर्षांपूर्वीचा खून, अजूनही तपास अपूर्ण
महादेव दत्तात्रय मुंडे, गाव कन्हेरवाडी येथील व्यक्तीचा खून 22 ऑक्टोबर 2023 रोजी परळी वैजनाथ तहसील कार्यालयासमोर झाला होता. परळी पोलीस स्टेशनचे सानप नावाचे पीआय त्या वेळी होते. त्यांनी घटनेचा उलगडा केला होता. मात्र, आका आणि आणखी कोणीतरी आरोपींना अटक करू नका, राजाभाऊ फड आणि इतरांनाच अटक करा, असे सांगितल्याने तपासावर दबाव आणल्याचे समजते. विशेष म्हणजे या खुनातील सहा आरोपी हे आकाच्या आजूबाजूला फिरताना दिसतात, असे म्हणत धस यांनी पुन्हा वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केला.
22 ऑक्टोबरपासून या खुनाचा तपास प्रलंबित आहे. आरोपी हे परळीतच मुक्तपणे वावरत असल्याचं सांगितलं जात आहे. सतीश फडचे मेव्हणे, जे पूर्वी पंकजा मुंडेंकडे होते आणि आता धनंजय मुंडेंकडे गेले आहेत, त्यांचा मृत्यू झाला. मात्र, अद्याप या प्रकरणाचा तपास लागलेला नाही, असं धस म्हणाले. दरम्यान, पीआय सानप हे प्रामाणिक अधिकारी असूनही त्यांच्यावर दबाव आणून त्यांची बदली करण्यात आली. चेतना कळसेपासून संतोष देशमुखांपर्यंत अनेक खुनांच्या प्रकरणांत तपास अद्याप प्रलंबित असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.